मुंबई : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात फरार असलेल्या दोन मुख्य संशयित आरोपींना बीड आणि बिहार येथून अटक करण्यात आली आहे. प्रकाश मिसाळ आणि अशोक साव अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांच्या अटकेमुळे चार्जशीटमध्ये नाव असलेल्या सर्व १८ आरोपींना आता पोलिसांनी गजाआड केले आहे.
पोलिसांच्या सखोल तपासातून महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यांमध्ये पसरलेले एक मोठे आंतरराज्यीय परीक्षा घोटाळा असल्याचे उघड झाले. विशेष तपास पथकाने कसून शोध घेत प्रकाश मिसाळ आणि अशोक साव या दोघांनाही अटक केली.
पोलिसांनी असा रचला सापळा
२८ जून रोजी होणार्या टीईटी परीक्षेच्या एक दिवस आधी हा गैरप्रकार समोर आला होता. भिवंडीतील एका रहिवाशाला प्रश्नपत्रिका विकण्याचा प्रयत्न तीन जण करत असल्याची गुप्त पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोणगाव परिसरात डमी ग्राहकांच्या मदतीने सापळा रचला आणि संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे प्रश्नपत्रिकेचे चार सेट मिळाले.
त्यानंतर पोलिसांनी त्या प्रश्नपत्रिका महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकार्यांकडून तपासून घेतल्या. जप्त करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत असल्याचे समोर आले.
ठाणे पोलिसांनी भिवंडी न्यायालयात दाखल केलेल्या चार्जशीटनुसार, या घोटाळ्याचा थेट संबंध उत्तर प्रदेशातील आग्रा इथल्या एका प्रिंटिंग प्रेसशी होता. प्रेसमधील दोन कर्मचार्यांनी ८,००० रुपयांसाठी प्रश्नपत्रिका कारखान्यातून चोरून बाहेर काढल्या होत्या. ही प्रश्नपत्रिका त्यांनी आपल्या बुटाच्या इनसोल्समध्ये लपवून बाहेर आणल्याचे तपासात समोर आले.
मास्टरमाईंडसह सर्व १८ आरोपी कोठडीत
भिवंडी न्यायालयात शुक्रवारी दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता याच्यासह एकूण १८ जणांची नावे आहेत. बिजेंद्र गुप्ता याच्यावर यापूर्वी ओडिशातील एका पेपरफुटी प्रकरणातही आरोप झाले आहेत. सर्व आरोपींवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.